Wednesday, November 26, 2014

माझी सहल

या वर्षी माझी सहल फार दूर जाणार होती आणि ती ही ३ दिवसांची. त्यामुळे मला बाबा पाठवतो का नाही ? असा मोठ्ठा प्रश्न माझ्यापुढे पडला होता. पण शेवटी बाबा तयार झालाच. शाळेवाल्यांनी तारिख ठरवली २०-११,२१-११ आणि २२-११ हे तीन दिवस. हे कळल्यावर शाळेत फक्त आणि फक्त ट्रिप, ट्रिप आणि ट्रिप या विषयावरच बोलणी सुरु होती.

२०-११-२०१४ 

अखेर २० तारीख उगवलीच. वेळापत्रकाप्रमाणे निघायचे ठरले. सकाळी ५ वाजताची वेळ सांगितली. आम्ही ५ वाजता गेलो तर सर्व मुले आली होती पण शिक्षक वर्ग आले नव्हते. नंतर हळुहळु यायला सुरवात झाली. बस सुटली बरोबर ६ वाजता. आमची बस होती माउली ट्रॆव्हल्सची.


पहिले अर्धा तास आम्हाला १२ जोतिर्लिंगांची माहिती टि.व्ही. वर दाखवली. पंढरपुर गेल्यानंतर आम्हाला ७ वाजता ’लय भारी’ हा सिनेमा दाखवला. मला तो सिनेमा खरच कंटाळवाणा वाटला. आम्ही ९ वाजुन ४५ मिनीटाला बरोबर येरमाळ्याला होतो. त्यानंतर १०.३० वाजता आम्ही कुंथलगिरीला पोहचलो.





तेथे आम्ही बाहूबलीचे दर्शन घेतले. तेथुन आम्ही १०.४५ ला निघालो. १२ वाजता आम्ही कपिलधा-यात पोहचलो. तेथे मन्मथ स्वामी मंदिर आणि नैसर्गिक धबधबा आम्ही पाहिला.








तेथेच जेवण केले. आम्ही मुले विरुद्ध मुली अशा भेंड्या खेळलो. ४ वाजुन ४५ मिनीटाला आम्ही बरोबर पैठणला पोहचलो. तेथे माहेश्वरी भक्त निवासात सामान ठेवुन आम्ही जायकवाडी धरण पाहायला गेलो.







आणि ७ वाजताच्या म्युझिकल फाउंटनला आम्ही साडे सहा वाजता ज्ञानेश्वर उद्यानात पोहचलो. तेथे थोड्यावेळ खेळलो. म्युझिकल फाउंटन पाहुन झाल्यावर आम्ही परत आलो. त्या दिवशी आमच्या वर्गातल्या श्रुती कुलकर्णीचा वाढदिवस होता. आम्ही तो साजरा केला. सरांनी त्यासाठी केक आणला होता. त्या दिवशी आम्ही खुपच मज्जा केली.




२१-११-२०१४

सकाळी भरभर आंघोळी आटपुन आम्ही दर्शन घेतलं. आणि आम्ही बरोबर आणलेल्या कॆटररनी केलेला इडली-सांबर आम्ही खाल्ला आणि औरंगाबादकडे रवाना झालो. जाता जाता आम्हाला डॊ. प्रकाश बाबा आमटे हा सिनेमा अर्धाच दाखवला. औरंगाबादला आम्ही बिबीका मकबरा (ताजमहालची प्रतिकृती) पाहिला. 







आणि पाणचक्की देखिल पाहिली. पाणचक्कीला आम्हाला खरेदीला सोडले. मी आईसाठी एक सुंदरशी पर्स खरेदी केली. आमचं त्यादिवशी ठरल्या प्रमाणे प्राणीसंग्रहालय आणि म्हैसमाळ (महेशमाळ) काही बघणं झालं नाही. परत दुस-या दिवशी ठरलेल दौलताबाद आम्हाला त्याच दिवशी दाखवलं गेलं. दौलताबादला आम्हाला फार वेळ लागला. 









आम्ही १२ वाजता दौलताबाद चढायला सुरवात केली तर आम्ही उतरलो ४ वाजता. उतरल्यानंतर आम्ही जेवण केलं. आणि मी सुद्धा उतरल्यानंतरच पडली त्यामुळे मला खरचटलं. दौलताबाद झाल्यानंतर आम्ही खुलताबादला गेलो. तेथे एका लॊजमध्ये राहण्याची सोय केली होती. खरतरं दोन्ही ठिकाणी राहण्याची सोय स्वच्छ ठिकाणी केली होती. सामान ठेवुन आम्ही घृष्णेश्वर ला गेलो. तेथुन दर्शन घेउन आम्ही परत आलो आणि खूप थकलेलो असल्यामुळे जेवण करुन पटकन झोपलो.


२२-११-२०१४

सकाळी भरभर आटपुन आम्हाला नाश्त्यासाठी वडापाव खायला दिला. आदल्या दिवशी पडल्यामुळे माझ अर्ध लक्ष त्याकडेच होतं.
सकाळी भद्रा मारुतीचं दर्शन घेउन आम्ही परत निघालो. वेरुळची जगप्रसिद्ध कैलास लेणी आम्ही पाहिली. 




ही अशी पहिली वास्तु आहे कि जिला वरुन खालपर्यंत बांधत आणले आहे. यादिवशी आम्ही दत्त देवगडला गेलो. तेथेच जेवण केले व हा शेवटचा दिवस असल्यामुळे आम्हाला कॆटररकडुन आईसक्रिम मिळाले. त्यानंतर परत ठरल्याप्रमाणे आमचं नगरचं टॆंक म्युझियम झालच नाही. आम्ही पंढरपुर मार्गे आलो म्हणुन मी सरळ फॆबटेकवरचं उतरली. मी घरी रात्री ११ वाजता पोहचली. कारण कॆटरर घेतल्यामुळे एका हॊटेल समोर थांबवुन त्यांनी तेथे नाश्ता बनवला.
त्यादिवशी घरी आल्यावर मला खरचं छान वाटलं.

Monday, October 27, 2014

झंबूचे उन्हाळी वर्ग

झंबू आता मोठी झाली होती. ती आता दुसरीच्या वर्गात उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यावर जाणार होती. तिने पहिलीत पूर्ण वर्गातून पहिला क्रमांक पटकावला होता. तर झंपड आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर सातवीच्या वर्गात जाणार होती. खरंतरं झंपडने पहिल्या सारखा पहिला कमांक पटकावला नव्हता तरं तिचा सहावीत दुसरा कमांक आला होता. झंबूने पहिल्याच वर्षी पहिला क्रमांक आणल्यामुळे घरचे सर्व (आई,बाबा आणि आजी) झंपडला मुद्दामून चिडवत तर कधी रागवत. एकदा तर म्हणाले," बघ जरा तुझ्यापेक्षा झंबु किती हुशार आहे. काहीतरी शिक तिच्याकडनं " असं म्हणलं की झंबूला मजा वाटे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होवुन एक महिना सुद्धा झाला नव्हता तेव्हा एकेदिवशी आतल्या खोलीमध्ये झंबू आणि झंपड खुप दंगा करत होत्या तेव्हा आई पेपर वाचत असलेल्या बाबांना म्हणाली," ऐकताय का? मला झंबुची काळजी वाटते. " बाबा पेपर खाली करुन आईला विचारतात," काय गं? कसली काळजी वाटतेय तुला? "

आई, " मागच्या वेळेस काय घडलं होतं माहित आहे ना तुम्हाला ? "
बाबा, " काय बाबा, काय घडलेलं? "
आई, " अहो! मागच्या वेळेस उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तिने कंटा्ळा येतोय म्हणुन माझं डोकं खाल्ल होतं. आपण तिला या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कसल्यातरी क्लासला पाठवलं पाहिजे. "
आजी, " मला तरी वाटतं की तिला गाण्याचा क्लास लावावा. " आजीला गाणे फार आवडायचे ना म्हणुन ती असं म्हणाली होती.
तेवढ्यात आई म्हणाली, " तिला जर आपण बॆडमिंटनचा क्लास लावला तर कसं होईल ? " 
बाबा, " त्यापेक्षा आपण तिला स्विमींगचा क्लास लावणे अधिक उपयोगाचे ठरेल "
झंपड बाहेर येउन म्हणते, " आपण जर तिला बॊक्सिंगच्या क्लासला लावु. म्हणजे एखाद्यावेळेस ती मेरी कोम झाली पाहिजे. नाहितर हे जर आपण तिलाच विचारलं तर ? "

झंबु लगेच बाहेर येते आणि म्हणते, " मी सगळं ऐकलं आता मला गाण्याच्या क्लास ला जायला आवडेल "

झंबुला नंतरच्याच दिवशी झंपड्ने कॊलिनीतल्या भारती काकूकडे नेले. त्या गाण फार छान शिकवायच्या. त्यांच्याकडे झंपड्ने झंबूचे नाव नोंदवले आणि १५०रु. शुल्क भरले आणि झंबूला त्याच दिवसापासुन क्लास लावला. तिथे ती फार रमली.

१ जूनला झंबुची गाण्याच्या क्लासची परिक्षा होती. आणि बरोबर ३० मे ला तिने  बाजूच्या माधुरीच्या वाढदिवसाला जाउन तेथील केक खाल्ला, आणि तिचा घसा बसला. दुसया दिवशी तिला औषधे देउन घसा बरा करण्याचे सर्वांचे प्रयत्न चालु होते. संध्याकाळ पर्यंत तिचा घसा ब-यापैकी बरा झाला.तेव्हा ती बाबांना म्हणाली, " मला समोसे खायचे आहेत. "

बाबा म्हणाले, " आज नाही ग, उद्या तुझी परीक्षा आहे आणि आत्ताच घसा बरा झाला ना. तुला समोसे आज नाही मिळणार. " असं बाबांनी म्हटल्यावर झंबुचा चेहरा एवढासा झाला.

दुस-या दिवशी झंबुची परीक्षा छान झाली. पण तिचा थोडासा आवाज बसला होता. त्यामुळे तिचा या परीक्षेत मात्र ३रा नंबर आला. घरी आल्यावर तिला फार वाईट वाटत होते. तेव्हा आजी म्हणाली, " झंपड शिक जरा काही लहान बहिणीकडनं. "

झंबु, " आजी पण तर माझा तिसरा नंबर आला "
आजी, " अगं पण तुझा घसा बसल्यावरसुद्धा तु तिसरा क्र्मांक पटकावला. झंपड तर एवढं पण नाही करु शकत."

तेवढ्यात दारावरची बेल वाजते. झंपड दार उघडते तर घरातल्या सर्वांना खमंग वास येतो पाहतोतर काय ! बाबांनी त्यांच्या हातात एक पिशवी पकडली असते आणि त्यात गरमागरम समोसे असतात. हे पाहिल्यावर झंबूतर आनंदाने उड्याच मारायला लागते.