Wednesday, May 9, 2018

सिनेमा-एक वेड

सिनेमा म्हटलं की मनातुन खूप आनंद होतो. मनोरंजनाचं एक साधन म्हणजे सिनेमा असतो. प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते पण या जगात अशी एकही व्यक्ती सापडणार नाही जिला सिनेमा नाही आवडत. लहान मुलांना विशेषतः कार्टुन मुव्ही आवडतात. त्यातही मुलांना कार्सआणि मुलींना बार्बीआवडते. पण खरं म्हणजे आम्ही मुली बार्बी बरोबरचं कार्स पण पाहु शकतो. ह्या मुलांचीच नाटकं फार असतात. मी तरं लहानपणापासुनचं दोन्ही खुप आवडीने पाहायचे. पण आता मात्र ते सर्व पहायला खुप कंटाळा येतो.

मला आवडणा-या सिनेमांपैकी एक म्हणजे थ्री इडिय़ट्सआहे. तसं पाहिलं तर मला खुप सिनेमे आवडतात. पण जास्तीत जास्त हाचं आवडतो. माझ्या आयुष्यातला पहिला थिएटर मध्ये पहिलेला सिनेमा म्हणजे अगं बाई अरेच्चाहोता. त्यावेळेला मी साधारणतः ३ वर्षाची होते. मला तरं काहीचं आठवत नाही पण आईने सांगितलं.

सांगायचं झालं तर असं की मुळातचं आम्हा किन्हीकरांना सिनेमाचं फार वेड. इतकं की "हमारे रगों मे सिनेमा दौडता हैं" असं म्हणायला हरकत नाही. बाबाने सांगितल्याप्रमाणे त्याचे आजोबा म्हणजेचं माझे पणजोबा सुद्धा सिनेमाच्या वेडापासून वंचित राहिलेले नव्हते. बाबाने मला एकदा आमच्या आजोबा व काका आजोबांची गंमत सांगितली होती. ते लोकं दुपारच्या वेळेला पणजोबांना काहितरी काम आहे असं सांगुन बाहेर पडायचे आणि थेट थिएटरमध्ये जाउन बसायचे. पण मात्र पणजोबा त्यांना सांगून ठेवायचे की बरोबर ४ वाजता घरी ये काम आहे’. मग जर एखाद्यावेळेला हे ३ वाजता बाहेर पडले असेल तर बरोबर ४ वाजता (तो सिनेमा अर्धा सोडुन) ते घरी परतायचे.

त्या काळी असे असायचे. तसेच ते सगळे एकदा वेगळे वेगळे बाहेर पडले आणि कोणी आपल्या मित्राबरोबर तर कोणी एकटेच असे संगमया सिनेमाला गेले आणि काही वेळाने त्यांच्या लक्षात आलं की ते एकाचं रो मध्ये बसले आहेत आणि सगळे घरी खोटं बोलले आहेत. खरचं या अशा खट्याळ गोष्टी ऐकताना मज्जा वाटते. त्या काळात सुद्धा सिनेमाचं लोकांना एवढं वेड असेल का? हा प्रश्न पडतो. 



बाबा सुद्धा या सिनेमा च्या वेडापासुन दुर नव्हता. कराडला कॊलेजमध्ये असताना मात्र तो एक एक सिनेमा ७-७ वेळा पाहायचा. मला तर कळतचं नाही की कोणीही एकचं सिनेमा ७-७ वेळा कसं पाहु शकतं. आपण पण पाहतो, पण आपण जास्तीत जास्त महिन्यातुन दोनदा टि.व्ही. वर लागला असेल तर पाहातो, असं पाहत पाहत सात आठ वेळा पाहतो. पण बाबा व त्याचे मित्र मात्र तो एकचं सिनेमा रोजरोज त्याच टॊकिजमध्ये आठवडाभर पाहायचे. (कंटाळ नाही यायचा का कोण जाणे!)


त्याने मला सांगितल्याप्रमाणे त्याने अग्निपथ’ (अमिताभ बच्चन चा), ’मैने प्यार किया’, ’हम आपके है कोनआणि मुख्य म्हणजे तेजाबहे सिनेमा एवढ्या वेळा पाहिले की काय सांगावे ?


एखाद्या मुलाने इतिहासातल्या केमालपाशाची कामगिरी पाठ करावी तशी बाबाने त्या तेजाबमधल्या अनिल कपूरची कामगिरी (त्याचे डायलॉग) पाठ केली. आजपण जेव्हा तेजाबहा सिनेमा टि.व्ही. वर लागतो तेव्हा बाबा हातचा रिमोट सोडत नाही. आणि तोच सिनेमा पाहत बसतो. तोच सिनेमा पाहताना तो त्या-त्या सिन ला ते-ते डायलॉग म्हणत असतो. आता तर त्यातले त्या मुन्नाचे मोहिनीचे आणि त्या लोटिया पठाणचे डायलॉग्स तर मलासुद्धा पाठ झाले आहे. पण त्या सिनेमा मध्ये सारखं मागचं पुढचं असं दाखवतात म्हणुन त्याची स्टोरी अजुनपण मला उमगली नाही. त्यातल्या त्या अनिल कपूरचा "तुममेसे मुकुट बिहारी कोन है?" हा आणि याच्या पुढचे तर प्रत्येक डायलॉग बाबा ईतका जोशात म्हणतो की काय सांगावे. त्यामुळे हा सिन आला की मला आणि आईला त्या सिनचे दोन-दोन डायलॉग्स ऎकू येतात.


आमच्या घरची सिनेमाची मजा म्हणजे मला पूर्णपणे नवीन चित्रपट आवडतात आणि बाबाला त्याच्या काळचे. त्यामुळे संध्याकाळी टि.व्ही. लावल्यावर नक्की कोणता सिनेमा पाहावा या प्रश्नामुळे आमचा अर्धा वेळ हा भांडणात जातो.( आत्ताच दहावीची परिक्षा संपली म्हणुन.) शेवटी मग एखादा जुना पण  दोघांना आवडत असेल असा सिनेमा असला तर तो लावला जातो.

बाबाला न आवडणारा हिंदी हिरो म्हणजे टायगर श्रॉफ. त्या दिवशी मी हट्ट करून बाघीसिनेमा लावला होता. तर त्यात जेव्हा "छम छम छम" गाण्यानंतर ट्रेन मध्ये ती(श्रद्धा कपूर) तिच्या बाबांना शोधत असते तेव्हा तो(टायगर श्रॉफ.) खाली उतरतो आणि गाडी सुटते. तेव्हाच तिला तिचे बाबा दिसतात. आणि ती जोरात ओरडते "अरे, बाबा मिलगये." तर तो लगेच ओरडतो,"नही मिलें." ह्या डायलॉग्स वर आम्ही तिघेही जे हसलो जे हसलो की काय सांगावे.त्या डायलॉगवर बाबाने त्या टायगरची एवढी खेचली, बापरे! बाबा म्हणाला,"अरे वेड्या! तुला काय कोणी व्याकरण नाही का रे शिकवलं? अरे तिच्या वाक्याला पूर्णविराम लागतो प्रश्नार्थक चिन्ह नाही." आणि तेवढ्यात त्याला (हिरोला) तिच्या त्या "बाबा मिल गये" या वाक्यातले भाव कळतात आणि तो गाडी पकडायला धावायला लागतो. तेवढ्यात पडतो. तो पडल्या पडल्या बाबाचे वाक्य,"हा तर मला एक फाल्टी पिसचं वाटतो. निट ऐकू येत नाही, धावता येत नाही, वाक्य कळत नाही. वेडाचं आहे." तेव्हापासुन बाबाला तो आवडत नाही.



एक गोष्ट सांगायची झाली तर खरी सिनेमा पाहायची मजा ही थिएटरमध्येच असते. आणि ते सुद्धा शेवटच्या सिटवर. आम्ही जेव्हा नागपूरला होतो तेव्हा थिएटर वगैरे काही वाटायचं नाही. पण जेव्हा आम्ही सांगोल्यात गेलो तेव्हा तेथे थिएटर पण नव्हते. मग काय करणार? आम्ही असंच एके दिवशी अकलुजला भुतनाथ २पाहायला गेलो. (अकलुज म्हणजेच आर्चीचे गाव बरं का !) तेथे आम्ही पाहायला गेलो भुतनाथ २पण वेळेवर आम्ही पाहिला तो म्हणजे २स्टेट्सआणि तो पण फर्स्ट डे फर्स्ट शो. मज्जा आली होती आम्हाला आर्चीच्या गावात. तेव्हा माहित नव्हतं की हे गाव तिचं आहे ते. तेथुन आम्ही शिरपूरला गेलो. तेथे असताना आम्ही नाशिकला सिनेमा पाहायचो.  नाशिकला आम्ही सैराटपाहिला होता. सिनेमा ही गोष्ट आपल्या आयुष्यात खूप महत्वाची असते.       


तसं पाहिलं तर माझ्या आणि बाबाच्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या आहेत. तसंच बाबाच्या आणि आजोबांच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ मला साधारणतः नविन गाणे आवडतात आणि बाबाला टिपिकल त्याचे क्लासिकल गाणे आवडतात.(तसं तर क्लासिकल मी पण ऐकते पण रोज रोज तेच तेच तेच ऐकून शेवटी मला कंटाळा येतो.) आता परवाचीच गोष्ट. बाबाने गाडीत त्याचे  (आ.........उ......) गाणे लावले. तेच तेच ऐकलेले. मग मी म्हटलं की बाबा ९८.३ लाव आणि गाडीत ते सुरु झालं. तेव्हाचं नेमकं त्यात चांगले गाणे लागण्याऐवजी लागलं कोणततरी पंजाबी गाणं. त्यातले न कळणारे शब्द ऐकुन बाबाने ते लगेचं बदलवलं मी विचारलं कीका बदलवलसं?’ तर त्याने मलाचं विचारलं की त्यातला एकतरी शब्द तुला कळत आहे कामी म्हटलंनाही.मग बाबा म्हणाला की अरे मग कशाला ऐकतेस.मग बाबाने ते बदलवलं. तसं बाबाचं पण बरोबर आहे की त्यातला एकही शब्द मला कळत नव्हता. वास्तविक माझे आणि बाबाचे खुपसे भांडणं हे गाण्यांवरुन आणि सिनेमावरून झाले आहेत हे मला आठवतं.


खरचं यातुन एकचं गोष्ट लक्षात येते की काळाप्रमाणे सगळं काही बदलत जातं. आणि एका पिढीची आवड तिच पुढील पिढीची आवड असेल असं नाही. त्यात काही प्रमाणात साम्य असु शकतं पण संपूर्णपणे नाही. तरीपण सिनेमा हे पूर्वी दादासाहेब फाळकेंपासुन पुढे प्रत्येक भारतीयाचे एक वेडचं बनले आहे. आजसुद्धा फक्त तरुण पिढी नव्हे तर म्हातारे लोक पण सिनेमा पाहायला थिएटर मधे जातातचं. म्हणुनचं सिनेमाया शब्दाची एकचं डेफिनेशन होते ती म्हणजे- एक वेड’.
  

Saturday, December 31, 2016

नाटक.......

मी सोमलवार या शाळेत साधारणतः एक महिन्या पूर्वी आली.(खरतरं ही माझीच शाळा, पण इयत्ता चौथीतचं मी ही शाळा सोडून सांगोल्यात शिफ्ट झाली होती. आता परत याच शाळेत admission मिळाली.) या शाळेतील मला माझे सर्व जुने मित्र-मैत्रिणी परत मिळाले. 
 
नोव्हेंबर महिना असल्यामुळे गॅदरिंगचं वारं सध्या आमच्या शाळेत सुरु होतं आणि एके दिवशी आमच्या शाळेत एक घोषणा झाली ’आपलं गॅदरिंग २८,२९ आणि ३० (डिसेंबर) तारखेला होणार आहे. आणि आपली या वर्षीची संकल्पना आहे कॉमेडी.’ हे ऐकल्याबरोबर माझ्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना यायला लागल्या की आपण एखादा कॉमेडी एकपात्री प्रयोग बसवू शकतो. 
 
मग त्यादिवशी ब्रेकमध्ये मी आमच्या क्लास टिचर बोधनकर मॅडम कडे गेली आणि त्यांना विचारलं की मी एखादा एकपात्री प्रयोग करु शकते का? माझ्याकडे भरपुर कॉमेडी एकपात्री प्रयोग आहेत. मग आमच्या पी.टी.च्या तासाला मॅडमनी माझा एकपात्री प्रयोग पाहिला आणि शेवटी माझ्या ’व-हाड निघालं लंडनला’ या एकपात्री प्रयोगाचं सिलेक्शन झालं. 
 
त्याच क्षणाला मला माझ्या बाबानी सांगितलेलं एक कॉमेडी नाटक आठवलं आणि मी आमच्या मॅडमना त्याबद्दल विचारलं तर त्या म्हणाल्या की तू कोणाकोणाला घेशील तूझ्या नाटकामध्ये? तर मला आधी भार्गवी बाबरेकर हिचं नाव सुचलं. मी तिला जाउन विचारलं तर ती त्या नटकामध्ये काम करायला हो म्हणाली. आता उरले अजुन २ जणं, आता कोणाला घ्यावं? मग भार्गवीने मला सांगितलं की तुमच्याच वर्गातला आहे एक मुलगा ’कौस्तुभ बेगडे’. मला एवढं काही माहित नव्हतं पण म्हटलं विचारुन पाहू त्याला. मॅडमनी त्याला विचारलं तर तो देखील हो म्हणाला. आता फक्त एकाची गरज होती. मग मॅडम म्हणाल्या की तुम्ही रोहन जोशीला घ्या. त्यालादेखील विचारलं तर तो पण हो म्हणाला.   
 
त्यादिवशी वेळ नव्हता म्हणुन फक्त स्टोरी सगळ्यांना सांगितली. त्यानंतर सोमवारी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा अचानकच भार्गवी आणि रोहननी नाही म्हणुन सांगितलं. मग आता काय करणार? तो दिवस तर तसाच गेला. 
 
दुस-या दिवशी मी आमच्या वर्गातल्या भावना ला विचारलं तर ती हो म्हणाली पण तिने थोड्याच वेळात नकार दिला. मग आमच्याच वर्गातल्या श्रावणीने मला नाटकात घेतेस का? म्हणुन विचारले होते, मग मी तिला घेतलं पण तिने पण थोड्या वेळातचं नकार दिला. आता काय करावं? मग माझ्या लक्षात आलं की आमच्या वर्गातील उदय आणि भावेश हे मुलं मला सकाळपासुनच विचारत होते की नाटकात कोणता रोल बाकी आहे का? मग मी शेवटी त्यांनाच नाटकात घेतलं. आणि उरला आता अजुन एक रोल मग मी ’ई’ सेक्शनमधल्या गायत्रीला विचारले ती हो म्हणाली. म्हटलं की आता जर हिने नाही म्हटलं तर मग मी यावर्षी नाटकचं करणार नाही. पण ही वेळ आली नाही.
  
 
या नाटकाची प्रेरणा मला माझ्या बाबाकडुन मिळाली. खरंतर आम्हा सर्व किन्हीकरांना नाटकाचं फार वेड. माझे पणजोबा, आजोबा, बाबा आणि आता मी. आम्ही सगळेच नाटक वेडे. मी जे नाटक बसवणार होती त्या नाटकाबद्दल मला बाबाने फार आधी सांगीतलेलं होतं आणि त्याची संकल्पना मला खुप आवडली म्हणुम माझ्या डोळ्यापुढे अचानक हे नाटक आलं. म्हटलं पाहु जमतय का ते.
  
 
आमची तालीम त्याच दिवसापासुन सुरु झाली. नाटक मात्र छोटसचं होतं पण त्यातील प्रत्येक पात्राला स्वतः मधलं अभिनयाचं कौशल्य सादर करायचं होतं आणि ते या कलाकारांनी सादर केलं. फक्त आणि फक्त एकच दिवस लागला आमचं नाटक बसायला. त्यादिवशीची तालिम आम्ही सर्वांनी स्र्किप्ट हातात घेउन केली पण दुस-या दिवशी मात्र आमचं पूर्ण नाटकचं पाठ झालेलं होतं. अखेरिस सिलेक्शन ची वेळ आली, तेव्हा नेमकं गायत्री ला काहीतरी लागलेलं होतं त्यामुळे मग आमच्या मॅडम म्हणाल्या की तुम्ही परत भार्गवीला घ्या नाटकात. मग काय? आम्ही भार्गवीला परत एकदा विचारलं तर तेव्हा ती हो म्हणाली. त्याच दिवशी आमचं सिलेक्शन होतं आणि भार्गवीची तर प्रॅक्टीस पण नव्हती झाली. तरीपण मग आंम्ही तिला वेळेवर काही ठळक ठळक डॉयलॉग सांगितले आणि प्रत्येकाचे हावभाव सांगितले. आम्ही सिलेक्शन साठी गेलो तर मॅडम म्हणाल्या की तुमचं सिलेक्शन उद्या होईल आणि शेवटी आमचं सिलेक्शन मात्र झालं.   
 
बघता बघता गॅदरिंगच्या तारखा जवळ आल्या. आमचं नाटक पुर्णपणे बसल्या गेल होतं. अक्षरशः आम्ही किती माईक मिळतील? हातात मिळतील की कॉलर माईक असतील की वरतुन टांगलेले असतील? याची खबर आधीच घेतली. हातात माईक असतीलचं म्हणुन आम्ही माईकच्या ऐवजी पेन हातात घेउन प्रॅक्टीस करायचो. तसेच आमचा ड्रेस काय असेल हे देखील आम्ही ठरवलेले होते.

  
२९ तारिख आली. आमचा कार्यक्रम १२ वाजता सुरु होणार होता. मला पोहचता पोहचता ११:३० झाले. पोहचल्यावर पाहिलं तर आमच्या नाटक ग्रुपमधलं एक उदय सोडुन बाकी कोणीच आलं नव्हतं. मी उदयला विचारलं तर तो शहाणा तिथे १०:३० पासुन येउन बसला होता. ११:४५ झाले तरी बाकीच्या तिघांपैकी कोणीच आलेलं नव्हतं आपल्या नाटकाचा नंबर कितवा आहे हे पाहिलं तर आमचा आठवाच नंबर होता. थोड्याच वेळात कौस्तुभ दिसला पण बाकिचे दोघं नव्हते आले. साधारणतः १२ वाजत आले होते आणि कार्यक्रमांना सुरवात झाली तरीही दोघं जण आलेले नव्हते. आम्ही त्यांना शोधायचा प्रयत्न करत होतो तर काही व्हॉलेंटियर आम्हाला परत परत रुममधे कोंडत होते. बाहेरच नव्हते जाउ देत. शेवटी आम्हाला आमचा चौथा मेंबर दिसला पण अजुनही भार्गवी आलेली नव्हती. आमच्या आधीचे सात डान्स पटापट झाले शेवटी आम्ही एका मॅडमना सांगितलं की नंतरचा आमचा नंबर आहे पण आमची एक मेंबर अजुन आलेली नाही आहे. आमची विनंती मॅडमनी ऐकली. आम्ही तर विचार पण केला होता की जर ती नाही आली तर काय करायचयं याचा. पण ती आलीच.   
 
आमच्या नाटकाच्या सुरुवातीला मी स्टेजवर जाउन आमच्या कलाकारांना स्टेजवर बोलावणार होती. (म्हणजे आमचं नाटक आम्ही वेळेवर तिथे बसवणार आहे असं दाखवायचं होतं). मग मी एकेकाला स्टेजवर बोलवायला सुरवात केली.   
 
 
 
सगळे समोरचं बसले होते पण भार्गवी मात्र मला कुठेच दिसली नाही. ती मागे बसली होती. मग तिला आम्ही स्टेजवर बोलावलं. नाटकाच्या वेळेला कौस्तुभ म्हणजेच आमचा नोकर काही त्याचे हावभाव विसरला. पण शेवटी त्याच्या लक्षात आल्यावर मात्र त्यानी ते नाटक रंगवले. तसेच आमच्या नाटकाच्या वेळेस मी सुद्धा काही डॉयलॉग विसरायची पण आमच्या सगळ्या कलाकारांनी खुप छान सादरीकरण केलं. 
 



नाटकाच्या वेळेस प्रत्येकाला स्टेजवर बोलावताना.
 





आमची पूर्ण नाटकाची Team.
 





पहिला सीन हसताना
 








सगळ्यात मस्त सीन रडतानाचा


 
आमचं नाटक खुप छान झालं. नाटक झाल्यावर आम्ही जेव्हा खाली आलो तेव्हा सर्वांनी आम्हाला सांगितले की खुप छान झालं नाटक, खुप मजा आली, खुप हसलो वगैरे वगैरे. नाटक एवढं छान होईल असं वाटलं नव्हतं. गॅदरिंगच्या शेवटच्या दिवशी तर मॅडमनी जबरदस्तीने आमच्या एकेकाच्या  तोंडात गुलाबजाम भरवले नाटक छान झालं म्हणुन.  (खरतरं नाटक सादर करताना एक दोन वाक्य गाळल्या गेलेले होते. पण ही गंमत फक्त आम्हा कलाकारांना माहिती. प्रेक्षकांना काही कळलेच नाही.)
  
३० तारखेला आमचा रिझल्ट लागणार होता. हा गॅदरिंगचा शेवटचा दिवस असल्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना प्रीतीभोजसाठी बोलाविलेलं होतं पण आम्ही आमचं जेवण वगैरे सगळं सोडुन फक्त आणि फक्त सेल्फीमध्ये मग्न होतो.(त्यासाठी खास कॅमेरा घेवून गेलो होतो ते वेगळच)   
 



शाळेत पोहचल्यावर मला माझी बालपणाची best friend सुकिर्ती दिसली. लगेच तिच्याबरोबर सेल्फी काढला.
 

 
                   भार्गवी बरोबर काढलेला सेल्फी



भार्गवीबरोबर
 





श्रेया कावळे
 





प्रीतीभोजच्या दिवशी काढलेले काही सेल्फी
 


गायत्री देशपांडे बरोबर

आणि तेवढ्यातच आमचा रिझल्ट सांगितला. ९वी च्या रिझल्टमध्ये आमच्या नाटकाचं कुठे नावच नव्हतं पण शेवटी सांगितलं की एक विशेष पारितोषिक आपण नाटकाला देणार आहोत. शेवटी आमच्या या नाटकाला विशेष पारितोषिक मात्र मिळालं.

         नाटकामध्ये काम तर खूपदा केलं होतं. पण स्वतः नाटक बसवण्याचा अनुभव मात्र पहिलाच होता आणि तो सफल झाला.